नकार देताच लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यात शिवशंभोनगर ते कात्रज -कोंढवा रोडवरील गोकुळनगर या अंतरासाठी एरवी ५० रुपये रिक्षा भाडे होते. तेथे रिक्षाचालकाने २०० रुपये भाडे मागितले. २०० रुपये देण्यास महिलेने नकार देताच २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स रिक्षाचालकाने जबरदस्तीने चोरून नेली.
ही घटना गोकुळनगर येथे २१ जून रोजी सायंकाळी पावणेचार वाजता घडली. याप्रकरणी एका ३५ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या आपल्या १० वर्षांच्या मुलीसह राहतात. त्यांच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या आईकडे रिक्षाने जात होत्या. गोकुळनगर येथील डॉमिनोज पिझ्झाजवळ रिक्षा आल्यावर त्यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले. भाडे किती असे विचारले असता त्याने २०० रुपये सांगितले. त्यावर फिर्यादीने भाडे जास्त होतेय. मी दरवेळी ५० रुपये भाडे देते असे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रिक्षाचालकाने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने ओढून घेतली. पर्स घेऊन रिक्षाचालक पळून गेला. पर्समध्ये १२ हजार ५०० रुपये, १५ हजार रुपयांचे कानातील लहान मुलाची सोन्याची रिंग जोड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, बँकचे चेक बुक असा २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.
याप्रकारामुळे फिर्यादी घाबरून घरी गेल्या. त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला. काही वेळाने त्या पुन्हा त्या जागी आल्या असता रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून गेला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून रिक्षा ज्या मार्गाने आली, त्या ठिकाणचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.