पुणे : बलात्कारांच्या घटनांवरून रिक्षा चालकांवर सरसकट कारवाई करण्याच्या पोलिसी धोरणाविरोधात रिक्षा पंचायत बुधवारी (दि. २२) निदर्शने करणार आहे. अन्य काही संघटनांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या पंधरवड्यात पुणे शहरात बलात्काराच्या दोन घटना झाल्या. दोन्ही घटनेत रिक्षा चालकांचा समावेश होता. यानंतर पोलिसांनी शहरातील सरसकट सर्वच रिक्षा चालकांची तपासणी सुरू केली आहे. त्यात विनालायसन, विना गणवेश आढळल्यानंतर दंड ठोठावला जात आहे.
रिक्षा पंचायतीने यास विरोध केला आहे. “पीडितांबद्दल पंचायतीला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्या पुनर्वसनात पंचायतही खारीचा वाटा उचलत आहे. असे असताना पोलीस सर्वच रिक्षा चालकांना एकाच तराजूत तोलून अन्याय करत आहेत,” असे पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले. या विरोधात बुधवारी दुपारी अडीच वाजता आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम आदमी रिक्षा संघटनेचे अंकूश आनंद यांनीही रिक्षा चालकांना पोलीस सरसकट दंड करून आर्थिक संकटात टाकत असल्याचे म्हटले. स्वारगेट ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पोलीस दंडेलशाही करणार असतील तर रिक्षा चालकही प्रवासी न घेण्याचे आंदोलन करतील असा इशारा दिला.