पुणे : घरची परिस्थिती बेताचीच. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले. त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्याने लष्करात येण्याचा मार्ग निवडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही. कुठलेही पाठबळ नसताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळवले. सार्थक ढवण असे त्याचे नाव. तो मूळचा कोल्हापूरचा आहे.वडील रिक्षा चालवायचे. आम्हाला शिकवताना त्यांची ओढाताण व्हायची. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांना मानाने जगता यावे यासाठी लष्कराचा मार्ग निवडला, असे सार्थक म्हणाला. वडिलांचे अनेक मित्र लष्करात होते. यामुळे त्यांच्यापासून लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. आई आज असती तर माझ्या यशाने तिला मोठा आनंद झाला असता. या प्रवासात माझ्या भावाने मला पाठिंबा दिला. आर्मी कॅडेट असल्यामुळे राष्ट्रीय रक्षा अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे सार्थक याने सांगितले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी १३६ व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ बुधवारी झाला. प्रबोधिनीतील विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य निवृत्त एअर मार्शल अजित भोसले यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. एनडीएचे प्रमुख एअरमार्शल आय.पी. विपीन, उपप्रमुख अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रा. ओमप्रकाश शुक्ला उपस्थित होते.>‘एनडीए’त महाराष्ट्र नाहीदेशासाठी लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे. मात्र, राज्यातील विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मराठी मुलांनी या मानाच्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर भरती व्हावे. - सार्थक ढवण
रिक्षाचालकाचा मुलगा लष्करी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:03 AM