पुणे : नोटाबंदीमुळे सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच गरीब कष्टकऱ्यांमधून मात्र प्रामाणिकपणाचे वस्तूपाठ घालून देणारी उदाहरणे समोर येत आहेत. वारजे परिसरात रिक्षामध्ये विसरलेली तब्बल अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केली. विशेष म्हणजे, त्याच वेळी ही रोकड हरवल्याची तक्रार घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मारुती एकनाथ मोरे (वय ६२, रा. गोकुळनगर, वारजे) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. मोरे यांच्या रिक्षात अहमदाबाहून आलेल्या तुलशी दिलीप गुप्ता (वय ५४, रा. पद्मावती) बसल्या होत्या. त्यांना मोरेंनी वारजे चौकात सोडले. रिक्षा निघून गेल्यावर आपली अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोंधळलेल्या अवस्थेतच त्यांनी वारजे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना रिक्षामध्ये पैशांची बॅग विसरल्याची माहिती देत असतानाच मोरे पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना आपल्या रिक्षात पैशांची बॅग विसरली असून, ती ताब्यात घ्या असे सांगितले. पाचशे रुपयांच्या पाचशे नोटा असलेली ही बॅग पोलिसांकडे सोपवण्यात आली. गुप्ता यांनी मालमत्तेच्या व्यवहारामधून मिळालेली ही रक्कम असल्याचे सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी मोरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
रिक्षाचालकाने केले अडीच लाख परत
By admin | Published: November 17, 2016 3:47 AM