लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विमा हप्त्यासाठी रिक्षाचा समावेश अन्य वाहनांमध्ये न करता त्यांचा स्वतंत्र गट असावा व त्यांच्या अपघातांचाही राज्यनिहाय विचार करावा, या रिक्षा पंचायतीच्या मागणीकडे भारतीय विमा नियामक प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
प्राधिकरणाने विम्याचा हप्ता निश्चित करण्यासाठी तीनचाकी वाहने ते सहाचाकी वाहने असा गट केला आहे. रिक्षा त्यामध्ये येते. वार्षिक हप्ता निश्चित करताना त्या त्या गटातील वार्षिक अपघात, झालेले क्लेम यांचा विचार केला जातो. रिक्षाचे अपघात एकदम कमी आहेत, त्या तुलनेत अन्य वाहनांचे अपघात जास्त आहेत, त्यामुळे हप्ता निश्चित करताना तो जास्त होतो व त्याचा भुर्दंड रिक्षा व्यावसायिकाला पडतो.
पंचायत सन २०१५ पासून प्राधिकरणाकडे त्यामुळेच रिक्षाचा विम्यासाठी स्वतंत्र गट करावा अशी मागणी करत आहे. सध्या रिक्षाला वार्षिक विमा हप्ता ७ हजार ४०० रूपये आहे. प्रवासी वाहन असल्याने तो जमा करणे बंधनकारक आहे, त्याशिवाय प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळत नाही. हे पैसे रिक्षा व्यावसायिकाला परत मिळत नाहीत. ते त्याला दरवर्षी जमा करावेच लागतात.
विविध संस्थांच्या पाहणीनुसार महाराष्ट्रातील रिक्षा अपघातांचे प्रमाण फक्त ३ टक्के आहे. रिक्षा ज्या वाहनगटात समाविष्ट आहे, त्या गटातील अन्य वाहनांचे अपघात मात्र संख्येने कितीतरी अधिक आहेत. रिक्षाचा स्वतंत्र गट म्हणून विचार झाला तर हा हप्ता फक्त २ हजार रूपयेच होईल व रिक्षा चालकाचा ५ हजार रूपये फायदा होईल, असे रिक्षा पंचायतीचे म्हणणे आहे.