पुणे :पुणेकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीने आता केवळ ४० रुपयांत शहरभर फिरता येणार आहे. एक दिवसासाठी हे दर असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिका हद्दीत फिरण्यासाठी केवळ ५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
पीएमपीने नुकतेच यासंदर्भातील दरपत्रक जाहीर केले आहेत. याचा फायदा पुणेकरांसह बाहेरून आलेल्या प्रवाशांनाही होणार आहे. विशेष म्हणजे हे पास थेट वाहकाकडूनच प्रवाशांना मिळणार असल्याने माेठी साेय हाेणार आहे.
दिवसाला १२ लाख प्रवासी संख्या असणाऱ्या पीएमपीची ग्रामीण भागातील सेवा काही दिवसांमध्येच बंद होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा पीएमपी प्रवास आणखी सुखद होईल. यातच पीएमपी प्रशासनाने ४० रुपयांत दिवसभर फिरा ही योजना सुरू केल्याने अनेकांचे पैसे वाचणार आहेत. याबाबत प्रवाशांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा, या हेतूने हे दरपत्रक जाहीर केले आहे.
पीएमपी पासचे दर..
१) ज्येष्ठ नागरिक (सर्व मार्गांसाठी) - ४० रुपये दिवसभर
२) एक दिवसासाठी प्रवासी पास (पुणे महापालिका हद्द) - ४० रुपये
३) एक दिवसासाठी प्रवासी पास (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द) - ५० रुपये
४) मासिक पास (एका महापालिका हद्दीसाठी) - ९०० रुपये
५) मासिक पास (दोन्ही महापालिका हद्दीसाठी) - १२०० रुपये
६) ज्येष्ठ नागरिक मासिक पास (सर्व मार्गांसाठी) - ५०० रुपये
यांना करता येतो मोफत प्रवास..
१) दिव्यांग आणि विशेष व्यक्ती - (वर्षभराचा पासदेखील मोफत)
२) वार्ताहर (वर्षभराचा पास मोफत)
३) स्वातंत्र्य सैनिक
४) केंद्र व राज्य शासनाचे विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती
५) दुर्धर आजार असलेले व्यक्ती
(या मोफत पास योजनेसाठी पीएमपी प्रशासनाऐवजी पुणे महापालिकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.)