भोर : भोर-पसुरे-पांगारी रस्त्यावर पसुरे व कर्नवडी गावांच्या सीमेपाशी पावसाळ्यात पडलेली दरड अद्यापही काढलेली नाही. शिवाय, कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून रात्री-अपरात्री रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, सदरची दरड काढून रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी होत आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरण खोऱ्यातील भोर-पसुरे-पांगारी हा रस्ता धारमंडप या ठिकाणी महाड-पंढरपूर रस्त्याला मिळतो. सदरचा रस्ता राजघर वेळवंड, जयतपाड नांदघूर, कोंडगाव, पांगारी, डेहेण, साळुंगण, अशिंपी, कुंड, राजिवडी, शिळींब या गावांत व कोकणात जाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक असते. मात्र, या रस्त्यावर पसुरे व म्हळावडी गावांच्या सीमेवर पावसाळ्यात दरड कोसळली आहे. दगडमाती गटारात व निम्म्या रस्त्यावर आली आहे. एका बाजूला भातखाचराची ताल आणि दुसºया बाजूला खोलगट भाग यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. एका वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत; त्यामुळे वाहनांना थांबून राहावे लागते.
दरड कोसळलेल्या ठिकाणी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावले नाहीत. रात्रीअपरात्री वेगात वाहन आल्यानंतर त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही, तर वाहन खोल भागात पडून किंवा तालीला धडकून मोठा अपघात होण्याची भीती आहे. या रस्त्यावर पडलेली दरडमाती काढून रस्ता वाहतुकीला खुला करण्याची मागणी होत आहे. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने नाराजी आहे.भोर-पसुरे पांगारी धारमंडप रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी असून, मातीने गटारी तुंबलेल्या आहेत. अनेक ठिकाणी जमिनी घेतलेल्या पार्टीवाल्यांनी खासगी रस्ता करण्यासाठी गटारे बुजवली आहेत. झाडेझुडपे वाढली असून, रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे.