पुणे - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत जास्तच भर पडत चालली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शाखेची परीक्षा तोंडावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या परिक्षेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. देशमुख यांनीही लागलीच सुळे यांची या मागणीची दखल घेतली असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे कळवले आहे.
वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होत आहेत. त्याच वेळी राज्यातील सुमारे ४५० विद्यार्थी आणि तेवढ्याच पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय अनेक उद्यार्थ्यांना अभ्यासाची साधनेही सध्या उपलब्ध नाहीत, अशी परस्थिती आहे.
राज्यभरातील जवळपास ५० हजार विद्यार्थी वैद्यकीय शाखेची ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्राद्वारे याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार सुळे यांनी तात्काळ त्यांच्या मागणीचा विचार करून अमित देशमुख यांच्याकडे हा विषय मांडत विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत देशमुख यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.