दौंड : नगर परिषदेची स्थायी समितीची येणारी सभा उपनगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दौंड नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीचे नगरसेवक तसेच सत्ताधारी नागरिक हीत संरक्षण मंडळाचे दोन नगरसेवक यांनी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या मनमानी कारभारामुळे सुरू केलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख, नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी जाहीर केले. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते सदरचे उपोषण सोडण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसाधारण तसेच स्थायी समितीची सभा होत नसल्याने विकासकामासंदर्भात निर्णय आणि ठराव घेता येत नव्हते. दरम्यान सर्वसाधारण आणि स्थायी सभा घेण्यात याव्या म्हणून नगरसेवकांनी काम बंद आंदोलनाबरोबरीने धरणे आंदोलन ६ ऑगस्टपासून नगर परिषदेच्या परिसरात सुरु केले होते. याकामी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परिणामी स्थायी समितीची सभा उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावे अशा सूचनाचे पत्र प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय पाटील यांना पाठवले. त्यानुसार तहसीलदार संजय पाटील यांनी हे पत्र आंदोलक नगरसेवकांना देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितल्याने नगरसेवकांनी उपोषण मागे घेतले. तसेच उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.२) रोजी ऑनलाइन स्थायी समितीची सभा होणार आहे.