पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात रोड शो करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यासाठी अजित पवार यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर हक्क मागून मिळत नाही, हक्कासाठी लढावं लागतं असा मजकूर लिहला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर ही पुण्यात झळकले असून, मेहनती, प्रामाणिक, निडर अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार गटात बॅनरबाजीवरून चढाओढ पाहायला मिळत आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांचे पुण्यात अनेक दौरे झाले. मात्र पुण्यातील कार्यकर्त्यांना अजित पवारांचे स्वागत करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या जिजाईपासून ते खेड शिवापूरपर्यंत रोड शो झाला. त्यासाठी पुणे शहरात अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, सुभाष जगताप, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, समीर चांदेरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले होते. हक्क मागून मिळत नाही, हक्कासाठी लढावं लागतं. महाराष्ट्राचे लाडके दादा. पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत, असे बॅनरवर लिहिले होते.
त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. मेहनती, प्रामाणिक, निडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे बॅनर शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी लावले आहेत. अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली असताना मुख्यमंत्र्यांचेही बॅनर्स झळकले आहे. नाना भानगिरे यांनी बॅनरदारे शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार गटात बॅनरबाजीवरून चढाओढ दिसत आहे. दोन्ही गटाच्या या बॅनरची पुणे शहरात चर्चा सुरु आहे.