केळवडे (ता. भोर) येथील बागायती शेतजमिनीचे भूसंपादन पुण्याभोवती होणाऱ्या रिंगरोडसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शासन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करणार आहेत.केळवडे गावातून रिंगरोड जात असून तब्बल २९ गटातील शेतजमिनी बाधित होत आहेत. त्यामुळे बागायती जमिनीतून रिंगरोड होऊ द्यायचाच नाही असा येथील शेतकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेतल्यामुळे जमीन रिंगरोडसाठी देण्याचा प्रश्नच येत नाही, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, जितेंद्र कोंडे, दिपक भडाळे, बाळासाहेब धुमाळ, राजेंद्र कोंडे, मोहन धुमाळ, बाळा आण्णा कोंडे,शंकर कोंडे, प्रदीप कोंडे,धनाजी धुमाळ, भाऊसाहेब जाधव,हरी कामठे आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
पश्चिम भागातील केळवडे,कांजळे,खोपी,कुसगाव, रांझे तर हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, मोरदरी, घेरा सिंहगड या गावात प्रामुख्याने बागायती शेत जमिनी आहेत.या पट्ट्यातील शेतकऱ्यांना या रस्त्यासंदर्भात शासन अधिकारी माहिती लपवीत असून कुठलीच माहिती अधिकारी देतच नाहीत त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.शेत जमीन जर रिंग रोड मध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येऊन अनेक शेतकरी भूमीहीन होतील. त्यामुळे शासनाने या प्रस्तावित भागातून जाणाऱ्या रिंगरोडला स्थगिती द्यावी. हा रस्ता शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांच्या हरकती घेण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह येथील बागायती शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हे बागायती क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या नापीक जागेचा रिंगरोडसाठी पर्याय म्हणून वापर करावा, अन्यथा हा रिंग रोड होऊ दिला जाणार नाही. येथील जमीन बागायती असल्यामुळे शासनाने खास बाब म्हणून विचार करूनच निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कुलदीप कोंडे यांनी दिला.
केळवडे ग्रामसभेत हरकतीचा ठराव घेण्यात आलेला आहे.
अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या त्याप्रमाणे संबंधित गावच्या सुनावण्या सुरू केल्या असून केळवडे गावाची हरकत आल्यास येत्या सोमवारी सुनावणी होईल.
राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी भोर
केळवडे (ता.भोर) येथे बागायती जमिनीतून रिंगरोड होऊ द्यायचाच नाही, असा येथील शेतकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेतला. त्याप्रसंगी कुलदीप कोंडे, शामसुंदर जायगुडे आदी मान्यवर शेतकरी.