पुणे : मेट्रो कामासाठी कर्वे रस्त्यावर एसएनडीटी विद्यापीठासमोर करण्यात आलेल्या बदल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ‘चक्राकार’ प्रयोगामुळे वाहतूककोंडीबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात असल्याचे मंगळवारी (दि. १५) दिसून आले. सलग दुसऱ्या दिवशी वाहनचालकांचा गोंधळ उडाल्याने रात्री या चौकात सरळ जाणाºया वाहनांना वाट करून देण्यात आली. तिथेही नियोजन नसल्याने वाहनचालकांकडून घुसखोरी केली जात होती.
कर्वे रस्त्यावर अभिनव चौकापासून पुढे मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या चौकातून काही अंतरापर्यंत दोन्ही बाजुने रस्त्याची एक लेन बंद करण्यात आली आहे. पौड रस्त्याकडून येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने या परिसरात मोठी वाहतूककोंडी होते. हे टाळण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलापासून एसएनडीटी विद्यापीठापर्यंत रस्ता दुभाजक बसवून रस्त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. विद्यापीठासमोर बॅरिकेड्स लावून सरळ जाणारा मार्ग अडविण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी सलग दुसºया दिवशीही वाहनचालकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
कर्वे रस्त्याने सरळ जाऊ इच्छिणारे वाहनचालक उजव्या बाजूने पुढे येत होते, तर आठवले चौकाकडे जाणारी काही वाहने डाव्या बाजूच्या लेनमधून पुढे येत होती. विद्यापीठासमोर आल्यानंतर चालकांना चुकीच्या लेनमध्ये घुसल्याचे समजत होते. त्यामुळे काही चालक तिथेच थांबून वॉर्डनला बॅरिकेड्स हटविण्याची विनंती करताना दिसत होते. सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्याने, तसेच चालकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागल्याने विद्यापीठासमोरील बॅरिकेड्स हटवून एक बस जाईल एवढा मार्ग खुला करण्यात आला. पण त्यामुळे चालकांची डोकेदुखी आणखी वाढली. चुकून डाव्या बाजूने आलेले चालक उलट्या दिशेने विद्यापीठाकडे वळू लागले. तसेच विद्यापीठासमोरूनही काही चालक यू टर्न घेत सरळ जाण्यासाठी धडपड करत होते. या ठिकाणी मेट्रोचे वॉर्डनही नव्हते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.विधी महाविद्यालय रस्ता कोंडीतमेट्रोच्या कामामुळे तसेच कर्वे रस्त्यावरील वाहतूक आठवले चौकाकडे वळविण्यात आल्याने विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी बराच वेळ या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही रांग काही वेळा अभिनव चौक ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयापर्यंत आली होती. त्यामुळे वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावालागला.