पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्यात १७३.७२ किलोमीटर लांबीचा रिंगरोड तयार करत आहे. यासाठी १५८५.४७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणाऱ्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना ''समृद्धी महामार्ग''प्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट आर्थिक मोबदला मिळणार आहे.
पुणे शहर आणि लगतच्या पाच तालुक्यांतील ८१ गावांतून रिंगरोड जाणार आहे. पूर्व भागातील ४६ गावे, तर पश्चिम भागातील ३८ गावांचा समावेश आहे. या रिंगरोडचा बांधकाम खर्च १७ हजार ७२३.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जर हा रिंगरोड बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर राबविल्यास २६ हजार ८१८.८४ कोटी रुपये खर्च येणार आहे. १५८५.४७ हेक्टरपैकी १३६ हेक्टर वनजमिनीचा वळतीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे दाखल करण्यात आला आहे. या वनजमिनीची तपासणी तसेच मोजणी प्रक्रिया सुरू आहे.
----
प्रकल्पाची तांत्रिक बाजू...
रिंगरोडचा हा प्रकल्प आय. आर. सी SP-99-2013 (मॅन्युअल ऑफ स्पेसिफिकेशन अँड स्टँडर्ड फॉर एक्सप्रेस वे) नुसार सल्लागाराने तयार केला आहे. द्रुतगती महामार्गाच्या मानांकानुसार १२० किलोमीटर प्रतितास या वेगासाठी ही नवीन लांबी विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.
----
जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून नकाशे तयार केल्यानंतर तहसील कार्यालय हे प्रत्यक्ष गावागावांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासले जाणार आहेत. त्यातील रेडिरेकनरचे दर आणि प्रत्यक्ष बाजारभाव तपासून या दोन्हीतील जो भाव जास्त असेल, त्याच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगरोडबाधित शेतकऱ्यांना नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या ''समृद्धी महामार्ग''च्या धर्तीवर बाजार मूल्यानुसार दिला जाणार असल्याचा निर्णय झाला आहे.
- संदीप पाटील, उपअभियंता, एमएसआरडीसी
-
दृष्टिक्षेपात रिंगरोड...
* रिंगरोडची एकूण लांबी :- १७६.७२ किलोमीटर
* रिंगरोडसाठी लागणारी एकूण जमीन :- १५८५.४७ हेक्टर
* रिंगरोड उभारणीचा एकूण खर्च :- १७ हजार ७२३.४१ कोटी
* बीओटी तत्त्वावर रिंगरोडचे बांधकाम केल्यास येणारा खर्च :- २६ हजार ८१८.८४ कोटी रुपये
* पश्चिम रिंगरोडचे आतापर्यंत एकूण भूसंपादन :- ५५ टक्के
* पाच तालुक्यांतील ८१ गावांमधून रिंगरोड जाणार