Delhi Violence : 'दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचे अपयश; अमित शहांनी राजीनामा द्यावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:35 PM2020-02-27T16:35:19+5:302020-02-27T17:45:57+5:30
दिल्लीत सुरु असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली.
पुणे : दिल्लीत सुरू असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली. ते पुणे महापालिकेत हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी बातचीत केली.
पुढे ते म्हणाले की, चाकण एमआयडीसीचा विचार करता किमान डेमोस्टीक विमानतळ होणे गरजेचे असल्याचे मी यापूर्वीच संसदेत बोललो आहे. खेडचे विमानतळ दुदैवी धोरणामुळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे गेले असल्याची टीकाही त्यांनी केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 'नाशिक-पुणे' रस्त्याचे काम आगामी दिड ते दोन वर्षात पुणे - नाशिक रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे - नाशिक रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड घाट बायपासचे कामपूर्ण होत आहे. याशिवाय इतर चार बायपासची निवीदा प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर काम सुरू होईल असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- हडपसर विधानसभा मतदार संघातील विविध कामांसाठी आयुक्तांसमवेत बैठक झाली.
- रस्ते, पाणी, भामा आसखेड आदीवर चर्चा,सहा ते आठ महिन्यात भामा आसखेडचे पाणी मिळणे अपेक्षित
- शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून भामा आसखेडचा प्रश्न सोडवू. बाधितांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे
दुसरी महापालिका झाली तर फायदाच आहे. कामाच्या समन्वयासाठी नवीन महापालिकेची निर्मीती होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी केंद्राकडे प्रयत्न करावा, असे शरद पवार यांनी आवाहन केले आहे.