पुणे : अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाचे सावट आता दूर झाले तरी अजून किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे. विदर्भाच्या व मराठवाड्याच्या बर्याच भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. हे सावट आता दूर झाले आहे. त्याचवेळी उत्तरेत थंडीचा कहर सुरु झाला आहे. उत्तरेकडील वार्यांचा जोर अद्याप आपल्यापर्यंत आला नाही. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात झालेली वाढ अजूनही कायम आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असली तरी तेथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १.८ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणच्या किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. पुढील दोन दिवसानंतर राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. १७ ते २० डिसेंबर दरम्यान गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.