पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले असून, याचा पहिला फटका गरीबाच्या भाकरीला बसला आहे. सर्वसामान्याचे खाद्य असलेल्या ज्वारीचे दर एक महिन्यात क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपयांची वाढले आहेत. राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे ज्वारीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून, परिणामी मार्केटयार्डमधील भुसार बाजारात आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड येथील भुसार विभागात प्रमुख्याने खान्देश येथील चोपडा, रावेर, धरणगाव, अंमळनेर, यावल, भुसावळ, एरंडोल, पारोळा याबरोबरच धुळे, नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यातोन बार्शी, करमाळा, मंगळवेढा, सांगोला, नगर जिल्ह्यातून जामखेड, खर्डा भागातून येत असते. सोलापूर, नगर जिल्ह्यातून येणारी ज्वारी गावरान असते. मात्र, यावर्षी या भागात दुष्काळ पडला आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे ज्वारीची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिथे थोडेफार उत्पादन झाले आहे ते तिथेच स्थानिक पातळीवरच विक्री झाली आहे. यामुळे पुण्याच्या मार्केटमध्ये यंदा ज्वारीची खूपच कमी आवक झाली आहे.
दर वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर मध्ये ज्वारीची आवक सुरु होते. गत वर्षी आॅक्टोबर, नाव्हेंबरमध्ये दररोज सुमारे २५ ट्रक ज्वारीची पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये आवक होत होती. यंदा आॅक्टोबरच्या पहिल्या १५ ते २० दिवस भुसार विभागात दररोज नियमित २५ ट्रक ज्वारी नेहमीप्रमाणे आवक झाली, परंतु गेल्या काही दिवसांपासून आवक अचानक कमी झाली. सध्या दररोज केवळ १ ते २ ट्रक ज्वारी मार्केट यार्डमध्ये येत आहे. राज्यात पडलेल्या दुष्काळाचे हे परिणाम असून, आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने ज्वारीचे दर क्विंटलमध्ये एक महिन्यात तब्बल १ हजार रुपयांनी वाढले आहेत. याबाबत व्यापारी प्रमोद छाजेड यांनी सांगितले की, दुष्काळ आणि डिझेलचे वाढलेले प्रचंड दर यांचा मोठा परिणाम मार्केटवर झाला आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे दर चांगलेच तेजीत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास ज्वारीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता छाजेड यांनी वर्तवली. सध्या बाजारात दुरी ज्वारीच्या प्रतिक्विंटलला २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपये दर मिळत आहे. दुरी ज्वारी ही गावरान ज्वारीच्या तुलनेत दजार्ने हलकी आणि आकाराने लहान असते. तर मालाची चमक, आकार यावरून ज्वारीला भाव मिळतो.ज्वारीचे सध्याचे बाजारातील दर प्रतिक्विंटलदुरी ज्वारी : २५०० ते २७००बेस्ट गावरान ज्वारी : ३५०० ते ३७००मिडियम बेस्ट ज्वारी : ३२०० ते ३४००एक्ट्रा बोल्ड ज्वारी : ४००० ते ४२००ज्युटला ज्वारी : ४२०० ते ४५०० ज्वारी ५० ते ६० रुपये किलो पर्यंत जाईलसध्या राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. त्यात ज्वारीचे उत्पादन होणा-या सोलापूर, नगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती अधिक गंभीर आहे. यामुळे मार्केट यार्डमधील भुसार बाजार येणा-या ज्वारीच्या आवकेमध्ये खूपच मोठी घट झाला आहे. याचा परिणाम ज्वारीच्या दरावर झाला असून, सध्या ४० ते ४५ रुपये किलोने मिळणारी ज्वारी येत्या काही दिवसांत ५० ते ६० रुपये किलो पर्यंत जाईल.- विजय मुथ्था, सहसचिव दि पुना मर्चंट्स चेंबर