लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने गौण खनिज आणि इतर माहिती तसेच जांभा दगडाच्या स्वामित्वधन यामध्ये वाढ केली आहे. नवे दर १ जुलैपासून लागू होणार आहेत. गौण खनिजसाठी प्रति ब्रास सहाशे रुपये स्वामित्वधन आकारणी केली जाणार आहे.
महसूल विभागाने सन २०१५ मध्ये गौण खनिज स्वामित्वधनमध्ये वाढ केली होती. त्यानंतर तब्बल पाच ते सहा वर्षांनंतर ही वाढ होत आहे. चुना तयार करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या भट्टीच्या सून खड्ड्यांमध्ये तसेच शिंपल्यावरून तयार करण्याच्या शिंपल्यासाठी सहाशे रुपये प्रतिब्रास याप्रमाणे आकारणी होईल. तसेच दगड- माती मुरूम यापासून तयार करण्यात येणाऱ्या भुकटीच्या वापरावर सहाशे रुपये प्रतिब्रास रॉयल्टी म्हणजेच स्वामित्वधन असेल. मंगलोरी कौले, साधी कौले यासाठी वापरात येणारी चिकन माती तसेच रस्त्यावर टाकण्यात येणारा मुरूम माती यासाठी ६०० रूपये प्रतिब्रास, तर विटा तयार करण्यासाठी वापरात येणारी माती गाळ यासाठी प्रतिब्रास २४० रुपये आकारणी होणार आहे.
सिरामिक धातू शास्त्रीय प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारी माती, सिमेंट प्रयोजनासाठी तसेच काच सामान तयार करण्यात खनिजावर मुंबईसाठी बाराशे रुपये प्रतिब्रास तर राज्याच्या इतर भागांमध्ये सहाशे रुपये प्रतिब्रास असेल. कलरची माती यासाठी पंधराशे रुपये ब्रास तर गौण खनिज वाळू माती मुरुम जाण्यासाठी ६०० रुपये प्रतिब्रास याप्रमाणे स्वामित्वधन मोजावे लागेल.