पुणे : दिवाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी बससाठी झुंबड उडाली आहे. बहुतेक शाळा-महाविद्यालये, काही खासगी संस्था, नोकरदार वर्गाला सुट्टया सुरू झाल्याने शनिवारपासूनच गावी जाण्यासाठी बसस्थानकांवर गर्दी झाली. प्रामुख्याने नागपुरसह विदर्भ व मराठवाडा, नाशिक, जळगाव या भागात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून दिवाळीनिमित्त राज्यभरातून जादा बस सोडण्यात येत आहेत. पुणे विभागातून एकुण ४३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि खडकीतील कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदानातून बस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या मार्गासाठी प्रवाशांकडून आरक्षण केले जात आहे. त्यामध्ये वातानुकुलित आसनी व शयनी शिवशाहीला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. जळगाव, धुळे, लातुर, नांदेड, परभणी, नागपुर, यवतमाळ, अमरावती व रत्नागिरीसाठी दोन्ही शिवशाहीचे आरक्षण जवळपास फुल्ल होत आले आहे. तसेच आसनी शिवशाहीचे नाशिक, सोलापुर, कोल्हापुर, सांगली, सातारासाठीच्या आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातून विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील गाड्यांना पसंती मिळत आहे. शनिवारपासून बहुतेक शाळा-महाविद्यालयांना सुट्टया सुरू झाल्या आहेत. काही खासगी संस्थांची कार्यालये, बँका, शासकीय कार्यालयांना पुढील आठवड्यात सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे एसटी बसला आरक्षणासाठी प्रतिसाद मिळत आहे. दि. ६ नोव्हेंबरपर्यंत लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. शिवाजीनगर आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे व स्वारगेट आगार व्यवस्थापक पी. एल. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांना शुक्रवारी दुपारनंतर गर्दी वाढली आहे. शनिवारपासून सुट्या सुरू झाल्याने गर्दी वाढली आहे. रविवारी ही गर्दी आणखी वाढेल. आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दोन्ही ठिकाणी आरक्षणाची एक खिडकी वाढविण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट मैदानावरही आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आॅनलाईन आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
जादा बस सुटण्याची ठिकाणे१. शिवाजीनगर बसस्थानक - नाशिक, औरंगाबाद. २. कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान - नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, हिंगोली, जाफराबाद, जालना, लातूर, जळगाव, धुळे, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा.३. पिंपरी-चिंचवड बसस्थानक - कोल्हापूर, चिपळूण, लातूर.४. स्वारगेट - सोलापुर, पंढरपुर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, बोरीवली, दादर