डॉ. प्रवीण भोळे : पुणे कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निवेदन आणि गायनाचा आलटून पालटून होणारा प्रवास म्हणजे कीर्तन. रंगभूमीचा इतिहास शिकवताना उगमामध्ये अनुकरण हा घटक दिसून येतो. कीर्तन सदृश भारतीय कलांमधून रंगभूमीचा उदय झाला, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) विभागप्रमुख डॉ.प्रविण भोळे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिरातून ऑनलाईन करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटनाला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरीदे आदी उपस्थित होते. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
तीन दिवसीय महोत्सवाच्या समारोपप्रसंगी शनिवारी (दि. ५) राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांना कीर्तन कोविद कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रबोधिनीच्या फेसबुक पेजवरुन हा कार्यकर्म पाहता येणार आहे.