पुणे : मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पर्यटन पूर्ण ठप्प होते. ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आणि पर्यटनाला काहीशी चालना मिळू लागली. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली असली तरी अजून तरी लोकांच्या प्रवासाच्या इच्छांवर परिणाम झालेला नाही. सहलींचे, निवासाचे ‘बुकिंग’ रद्द होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे सांगतले जात आहे.
सलग ११ महिने घरी बसून कंटाळलेले नागरिक दिवाळीनंतर पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. विशेषत: कोकण किनारपट्टीत तसेच महाबळेश्वर, माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सध्याच्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर अजून तरी प्रशासनाने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे बुकिंग रद्द होणे किंवा अॅडव्हान्स बुकिंगवर परिणाम झालेला नाही.
“आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये सध्या केवळ मालदीवचे बुकिंग होत आहे. बऱ्याच ठिकाणच्या सीमा अद्याप खुल्या झालेल्या नसल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे प्रमाण कमी आहे. केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात, काश्मीर अशा पर्यटनस्थळांचे एप्रिल-मेपर्यंतचे बुकिंग झाले आहे,” अशी माहिती गिरिकंद प्रवासी संस्थेचे विनायक वाकचौरे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग संपलेला नसल्याची जाणीव ठेवून प्रवासात सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचा दावा प्रवासी संस्थांकडून केला जात आहे.
पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटनस्थळांवरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभरातील एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्टवर ही सुविधा देणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
चौकट
“एमटीडीसीच्या पुणे विभागातील सर्व रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोरच खोल्यांचे निर्जंतुकीकरण करुन दिले जाते. पर्यटकांच्या प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेतली जाते, तपासण्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांचीही नियमित कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांना विश्वास वाटतो. पुणे विभागात महाबळेश्वर, माळशेज घाट, माथेरान, पानशेत, कार्ला, कोयनानगर या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये ९० टक्के बुकिंग होत आहे, तर भीमाशंकरमधील रिसॉर्टचे बुकिंग ६०-७० टक्के आहे. सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी दोन नवे रिसॉर्ट सुरु होत आहेत.”
- दीपक हर्णे, प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे विभाग, एमटीडीसी