पुणे : शहरात ९ मार्च, २०२० नंतर मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली असली, तरी यातील बहुतांशी रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत़ तरीही पुणे महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील पाचही झोनमध्ये (विभागनिहाय) ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, १ हजार ५५० खाटांची क्षमता असलेले हे सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला़ या बैठकीत रक्षकनगर येथे २००, बाणेर येथे ३००, खराडी पठारे स्टेडियम येथे ३००, बनकर शाळा येथे ३०० व संत ज्ञानेश्वर सभागृह येथे ३५० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
शहरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असली, तरी गंभीर रुग्ण संख्या कमी असून, आजमितीला केवळ ऑक्सिजन बेडची मागणी होत आहे़ यामुळे शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये २०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार असून, याचे सर्व नियोजन पुणे महापालिकेव्दारेच केले जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले़
--------------------