पुणे : तिसऱ्या लाटेत होम टेस्टिंग किटची मागणी खूप वाढली आहे. एका औषध विक्रेत्याकडून दिवसाला सरासरी ८ ते १५ किटची विक्री होत आहे. किटच्या सहाय्याने टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर माहिती लपवून ठेवू नये आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन औषधविक्रेत्यांनी केले आहे. नागरिकांनी लपवालपवी केल्यास साथ आटोक्यात येण्याऐवजी तिपटीने वाढेल, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
घरच्या घरी कोरोना चाचणी करता येईल, अशा रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने मागील वर्षी मंजुरी दिली. सध्याच्या लाटेमध्ये बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय केंद्र किंवा खाजगी प्रयोगशाळेत जाण्याऐवजी होम टेस्टिंग किट आणून चाचणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधित माहिती मोबाईल अँपच्या सहाय्याने पोर्टलवर नोंदवणे अपेक्षित असते. मात्र, विलगीकरणात रहावे लागण्याच्या भीतीने नागरिकांनी पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवली आणि ते गर्दीत मिसळत राहिले तर साथ आटोक्यात येण्याऐवजी संसर्ग वाढत राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
किटच्या सहाय्याने टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास
टेस्ट किटमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानले जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही, असे आयसीएमआरचे म्हणणे आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करावे लागेल.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास
ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानले जाईल आणि आरटीपीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.
''घरच्या घरी टेस्ट केल्यावर पॉझिटिव्ह आल्यास उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आरटीपीसीआर करताना संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, संपर्कातील व्यक्तींची माहिती, फोन नंबर, पत्ता अशी माहिती घेतली जाते. सेल्फ टेस्टिंगमध्ये पारदर्शकता ठेवणे हे संपूर्णतः त्या व्यक्तीवर अवलंबून असते. एखाद्याने माहिती लपवली आणि पॉझिटिव्ह येऊनही लोकांमध्ये मिसळत राहिल्यास संसर्गाचा धोका वाढतो. कोणत्याही आजाराच्या साथीत असा बेजबाबदारपणा आणि बेशिस्त आपल्याला परवडणारी नाही. गृह विलगीकरणाचे नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे. मेडिकल स्टोअरमधून किटची खरेदी झाल्यावर संबंधित औषध विक्रेत्याकडे बिलाची नोंद केली जाते. मात्र, टेस्ट कोणी केली, ती पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह, याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जनरल फिजिशियन डॉ. रोहित औटी यांनी उपस्थित केला आहे.''
''गेल्या १० दिवसांमध्ये जिल्ह्यात होम टेस्टिंग किटची मागणी खूप वाढली आहे. एक व्यक्ती एक किंवा एकाहून अधिक किट खरेदी करतात. आयसीएमआरची मंजुरी असल्याने किट खरेदी करताना डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, सौम्य लक्षणे दिसत असल्यास नागरिक रॅपिड अँटिजेन टेस्ट किटच्या सहाय्याने घरच्या घरी चाचणी करून पाहत आहेत. किटच्या माध्यमातून केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी सर्व औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करावेत. सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहून सर्व नियमांचे पालन करावे असे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले.''