पुणे : शहरातील सराईत गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयात बोलवून शांत राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानंतरही शहरातील लहान-मोठ्या टोळ्या पुन्हा डोकं वर काढून पोलिसांना आव्हान देत आहेत. येरवड्यात १२ वाहने फोडल्याची घटना ताजी असतानाच मुंढव्यात बुधवारी (दि. २८) ९ वाहने फोडल्याचा प्रकार घडला. या घटनांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान तर झाले, शिवाय सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात ७ वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वाहन तोडफोडप्रकरणी महादेव उखंडे (२२, रा. केशवनगर, मुंढवा) याला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. एकीकडे दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरू असतानाच, दुसरीकडे टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचा वचक कमी झाला आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहन तोडफोड करत भाईगिरी करणाऱ्यांनी पोलिसांना जेरीस आणले आहे. पोलिस आयुक्तांनी महिला सुरक्षितता आणि वाहन तोडफोडीविरुद्ध कारवाईचा संबंधित पोलिस निरीक्षकांना दिलेला टास्क पूर्ण झालेला नाही. त्यामुळे साहेब वाहन तोडफोडीतून होणारे आमचे आर्थिक नुकसान टाळा, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी येरवडा, मुंढवा, खडकीसह इतर ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कडक कारवाईचा इशारा दिला गेला. मात्र, असे असतानाही रायझिंग गँग आणि प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छोट्या-मोठ्या गुंडांकडून थेट पोलिसांना आव्हान दिले जात आहे.