लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: कांदा बियाण्यात झालेली फसवणूक, अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊन यांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या कांद्याचे बाजारभाव वाढले असून, दहा किलोस १२५ ते १४० रुपये असा भाव आज मिळाला.
चांगल्या प्रतिचा कांदा निघत नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांना वाढलेल्या बाजार भावाचा फायदा होत नसल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
कांदा बियाण्यात यावर्षी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. बहुतेक शेतात डेंगळे आलेले दिसतात. त्यामुळे कांद्याची प्रतवारी घसरली आहे. दुसरीकडे वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने कांद्याला मागणी कमी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव कमी झालेले दिसतात. चांगल्या प्रतिच्या कांद्याचे बाजारभाव वाढू लागले असले, तरी असा खूपच कमी कांदा विक्रीसाठी येत आहे. बहुतेक कांदा हा कमी प्रतीचा असल्याने त्याला बाजारभाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सात हजार पिशवी कांद्याची आवक झाली. एक नंबर गोळा कांदा दहा किलोस १२५ ते १४० रुपये, दोन नंबर कांदा ९० ते १३० रुपये, गोल्टी कांदा पन्नास ते शंभर रुपये, तर बदला कांद्यास २० ते ५० रुपये असा भाव मिळाल्याची माहिती सचिव सचिन बोराडे यांनी दिली. बाजार समितीत वीस विक्रेते कांद्याची विक्री करतात. तेरा खरेदीदारमार्फत कांद्याची खरेदी होते. सध्या हा कांदा उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये पाठविला जात असल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब बाणखेले यांनी दिली.
फोटो खाली:मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याचे लिलाव पार पडले.