सांगवी: बारामती तालुक्यातील सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याचे समोर आले आहे. सांगवी येथील लसीकरण केंद्रावर २०० ते ३०० नागरिक रांगेत उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाही. यामुळे आरोग्य प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली असून कोरोना संसर्ग होण्याचा मोठा धोका उद्भवू लागला आहे.
त्यातही सांगवी व परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात कार्यक्रमा दरम्यान २५ व्यक्तींपेक्षा अधिक लोकांना बंधन आहे. तर जमावबंदीच्या आदेशानुसार ५ लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र, सांगवीत आज २०० ते ३०० नागरिक एकत्र येऊन एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. सध्या ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. आज काहींना पहिला डोस देण्यात आला. तर या अगोदर डोस घेऊन ४५ दिवसांनंतर देण्यात येणाऱ्या दुसऱ्या डोससाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, सध्याची परीस्थिती पाहुन नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व पटल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्यातही दररोज मर्यादित डोस उपलब्ध होत असल्याने सांगवी आरोग्य केंद्रांच्या अधिपत्याखालील गावांसह, तालुक्यातून सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
सांगवी व परिसरातील नागरिकांचे लसीकरण सुलभ व्हावे यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी नागरिकांना वारंवार आवाहन करत आहेत. मात्र, नागरिक प्रशासनाच्या विनंतीला धुडकावून लावत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण येत आहे. गर्दी वाढू नये यासाठी लसीकरणा दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.