कामशेत : कोरोना संसर्गजन्य महामारी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त आहे. मात्र, त्यांचा डोळा चुकवून मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड येथून मावळात येणाऱ्या पाहुण्यांमुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. परिणामी मावळात दाखल होणाऱ्या नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे व मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या महामार्गावर मावळ तालुका आहे. कडक उपाययोजनामुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आहे. मात्र पुणे, मुंबई, पिंपरी - चिंचवड आदी शहरांतून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करून मावळात चार दिवसांत अनेकजण दाखल झाले आहेत. त्यामुळे या नागरिकांमुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाच्या समस्येत अधिकच वाढ झाली आहे.
खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत वडगाव पंचायत समितीमध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीवेळी खासदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. तरी देखील उपनगरातील नागरिक मावळात येत आहेत. दिवसा कडक बंदोबस्त असल्याने अनेक जण रात्रीच्या अंधाराचा अथवा पहाटेचा फायदा घेऊन मावळात येत असल्याने प्रशासनाला मागमूस लागत नाही. ज्यांच्याकडे हे पाहुणे म्हणून येत आहेत. ते याची माहिती प्रशासनाला देत नाहीत. आजूबाजूच्या नागरिकांना कळते पण आपापसात वाद नको किंवा आपणच का पुढाकार घ्यायचा इतर स्थानिक करतील तक्रार अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे मावळात सर्वत्रच गेल्या काही दिवसांमध्ये पुणे व मुंबई येथील पाहुणे यात बहुतांश नातेवाईक परत आल्याचे दिसत आहे. ग्रामीण भाग देखील यातून सुटला नसून डोंगर तसेच आडमार्गे मुंबई येथील नागरिकांनी अनेक गावांमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक फार्महाउस व बंगले मालक निवासी आले आहेत, अशी माहिती नागरिक देत आहेत. प्रशासनाने संबंधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
दोन लाखाची तपासणी, एकही नाही बाधित...मावळात तिसऱ्या टप्यातील २ लाख ११ हजार ९७५ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून अद्याप एकही कोरोनाबधित रुग्ण आढळला नाही. यातील ४ हजार ३७१ नागरिकांपैकी ४ हजार २ जणांची १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने सोडून देण्यात आले आहे. सध्या ३६९ जणांना अजूनही देखरेखीखाली ठेवले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.
ते ९९ पाहुणे विलगीकरण कक्षात...पुणे, मुंबई, पिंपरी आदी ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे भीती पोटी अनेक जण चोरून लपून मावळात येत आहे. मंगळवार (दि. २१) ते शुक्रवार (दि. २४) या चार दिवसांत पुणे, मुंबई, पिंपरी - चिंचवड व इतर शहरे आदी भागांतील ९९ नागरिक मावळ तालुक्यात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे तालुका सनियंत्रक राहुल चोकलिंगम दिली.