हणमंत पाटील , पुणेकात्रज येथील दुर्घटनेनंतर पुणे ते मुंबई महामार्गावरील खोपोलीजवळ दरड कोसळण्याची घटना रविवारी घडली. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका पुणे शहरात तब्बल २१ ठिकाणी आहे. त्याविषयीचा सर्व्हेक्षण अहवाल आपत्कालीन विभागाने तयार केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यावर अद्याप उपायोजनांची कार्यवाही केली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहराची भौगोलिक रचना खोलगट बशीसारखी आहे. त्यामुळे चारही बाजूला व मध्यवर्ती भागात अनेक डोंगर-उतार व टेकड्या आहेत. महापालिकेच्या हद्दीतील टेकड्यांच्या पायथ्याला अनधिकृत झोपडपट्ट्या व वसाहती आहेत. पावसाळ्यात यापूर्वी डोंगर-टेकड्यांवरील दरडी कोसळून झोपडपट्टीतील अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आपत्कालीन विभाग व पुणे विद्यापीठातील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रभागनिहाय सर्व्हेक्षण अहवाल तयार केला. त्या वेळी महापालिकेच्या १६ ते १८ प्रभागांतील २१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्वेनगर, वारजे, कोथरूड, चांदणी चौक, हडपसर-रामटेकडी, आगम मंदिर, कात्रज, येरवडा, कोंढवा-वानवडी, पर्वती पायथा, तळजाई वसाहत, बिबवेवाडी व जनवाडी-गोखलेनगर या भागांत दरडी कोसळण्याचा धोका आहे.
पुण्यातही दरड कोसळण्याचा धोका
By admin | Published: July 20, 2015 3:38 AM