पुणे : नदीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ‘आपली संस्कृती, आपली नदी’ हा अभिनव उपक्रम जीवित नदी या संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. आता कीर्तनाच्या माध्यमातून नदीची संस्कृती उलगडणार असून, नदीकाठाला पुन्हा विरंगुळ्याचे ठिकाण बनविण्याचा ध्यास या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.सध्या मुळा-मुठा नदीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ठिकठिकाणी नदीत कचरा टाकला जात आहे. तसेच घाण पाणीदेखील सोडले जात आहे. परिणामी गटारासारखी नदी दिसू लागली आहे. या नदीकाठच्या घाटांची देखील दुरवस्था झाली आहे. पूर्वी या ठिकाणी विरंगुळा म्हणून लोक फिरण्यासाठी येत असत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये नदीची अवस्था वाईट बनली आहे. जीवित नदीच्या अदिती देवधर यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘पेशवाईत लकडी पूल ते मुळा-मुठा संगम यादरम्यान सुमारे १४ घाट होते. घाट म्हणजे लोकांना नदीपर्यंत सहज जाता यावे यासाठी केलेली पायऱ्यांची व्यवस्था. लोकांचा नदीकाठी वावर होता. याचे हे घाट द्योतक आहे. पेशवाईनंतरही शहराचे नदीशी असलेले नाते तसेच राहिले. घरोघरी नळ आले तरी नदीकाठी वावर चालू राहिला. १२ जुलै १९६१ साली पानशेत व खडकवासला धरणे फुटल्याने मुठा नदीला पूर आला. पुण्याला ज्यातून पाणीपुरवठा होणार ती दोन्ही धरणे त्या दिवशी केवळ काही तासांत पूर्णपणे रिकामी झाली. लकडी पूल, शिवाजी पूल संपूर्ण पाण्याखाली गेले होते. काठावरची मंदिरे व घाट यांची पडझड झाली.’’‘‘शहराचा पाणीपुरवठा हे इतके मोठे आव्हान प्रशासनापुढे होते की, नदीकाठावर वाहून आलेले मंदिर, घाटांचे अवशेष, त्यात साठलेला गाळ व पाणी हे काढण्याकडे लक्ष वेधले गेले नाही. पूवीचा सुंदर नदीकिनारा विद्रूप झाला. घाण, डास ह्यामुळे हळूहळू लोकांचे नदीकाठी येणे कमी होऊ लागले. नदी आणि नदीकाठाशी असलेली जवळीक अशा तऱ्हेने संपली.’’ ‘‘लोकसहभागाशिवाय नदी पुनरुज्जीवन शक्य नाही. आपल्या नदीला परत एकदा जीवित करायचे असेल, तर लोकांना नदीजवळ आणणे गरजेचे आहे. नदीकाठ म्हणजे कचराकुंडी ही धारणा बदलायची असेल, तर नदीकाठ परत एकदा सांस्कृतिक, विरंगुळ्याचे ठिकाण बनवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा देवधर यांनी व्यक्त केली. जीवितनदीच्या ‘दत्तक घेऊ या नदीकिनारा’ या प्रकल्पाचा हाच उद्देश आहे. लोकांनी नदीकिनाऱ्याचा काही भाग दत्तक घ्यायचा, स्वच्छता करायची, तेथील जैवविविधता, पाण्यात विरघळलेला प्राणवायू ह्याची नोंद ठेवायची, प्रदूषण करणाऱ्या स्रोतांचा अभ्यास करायचा व त्यांच्या मुळाशी जाऊन, कचरा तेथे येऊच नये ह्यासाठी त्यावर उपाय शोधायचे, असे देवधर म्हणाल्या.
नदीबाबत तीन प्रकल्प सुरू मुठा नदी-विठ्ठलवाडी, मुळा नदी, औंध व मुळा- राम नदी संगम असे ३ प्रकल्प सध्या सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मुलांसाठी ‘नदीकाठच्या गोष्टी’, दिवाळी पहाट असे कार्यक्रम यापूर्वी आयोजित करण्यात आले होते.
आपली संस्कृती, आपली नदी कीर्तनातून नदीसंवर्धन करण्यासाठी कीर्तनकार मृदुला सबनीस कीर्तन करीत आहेत. त्या ‘आपली संस्कृती, आपली नदी’ या विषयावर मार्गदर्शन करतात.
ज्या जागांना आपल्या मनात स्थान असतं, त्या जागा जतन केल्या जातात, त्यांची काळजी घेतली जाते. नदीचे मनातील स्थान जसे नष्ट होत गेले, तसे नदीकाठाकडे दुर्लक्ष झाले, कचरा टाकण्याचे सोयीस्कर स्थान होत गेले. जेथे कचरा पडलेला दिसतो तेथे आणखी कचरा टाकण्यात काही गैर वाटत नाही. अशा रीतीने नदी आणि नदीकाठ म्हणजे कचरा, घाण, प्रदूषण असे नाते दृढ झाले.
- अदिती देवधर