लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : कोळवण खोऱ्यातील करमोळी ते चाले दरम्यानच्या वाळकी नदीवरील पुलाचे कठडे ढासळल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावर झाडे वाढलेली आहेत, त्यामुळे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोळवण भागातील अनेक नागरिक व शेतकरी या पुलाचा दळणवळणासाठी वापर करतात. या रस्त्यावरून पुढे हडशीला सत्यसाईबाबा मंदिर, पवना धरण, तुंग-तिकोणा, लोहगड-विसापूर हे किल्ले, लोणावळा ही पर्यटनस्थळे आहेत. सध्या शाळेला सुट्या असल्याने या रस्त्यावर पुण्यातून अनेक पर्यटक जातात. तसेच मुळशीतील अनेक लोक मुंबई, कामशेत, पवनानगर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. पूल अरुंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. तसेच या पुलावर लहान- मोठ्या अपघातांच्या घटना घडत असून, या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागच्या आठवड्यात वाळकी नदीवरीलच कोळवण ते हडशी दरम्यानच्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुख्य आधार असलेला खांब पडला होता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवठा केला तेव्हा या पुलाचे काम सुरु केले. तसेच मुळा नदीवरील घोटावडे येथील पूलही जीर्ण झाल्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी पडला होता. यावेळी पुलावरून जात असताना दाम्पत्य जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. अशा धोकादायक झालेल्या पुलांवर अपघात घडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे.
वाळकी नदीवरील पूल धोकादायक
By admin | Published: May 12, 2017 4:49 AM