पुणे : पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही परवानगी तात्पुरत्या स्वरूपात नाकारली असून नागरिकांना पूर्ण कल्पना भविष्यात रस्ता तात्पुरता बंद असेल असेही सांगण्यात आले.
सध्या संपूर्ण शहरात मेट्रोचे काम जोरदार सुरु आहे, नदीपात्रातही मेट्रोचे मोठमोठाल्या सांगाड्यांची उभारणी डोळ्यात भरते. मात्र लहान रस्ता आणि मोठ्या प्रमाणावर दुचाकींची ये-जा त्यामुळे खांब बसवण्यास अडचणी आहेत. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे आणि इतर भागातील उपनगरांना पेठ भागाशी जोडणारा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता शुक्रवार (दि.८) रात्री आठपासून सोमवार (दि.११)रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा रस्ता बंद असणार असल्याचे महामेट्रोतर्फे कळवण्यात आले होते. या संदर्भात महामेट्रोतर्फे नदीपात्र आणि पर्सिस्टंट कंपनीजवळ फलक लावण्यात आला होते. मात्र पुणे वाहतूक पोलिसांनी मात्र संबंधित रस्ता बंद करण्यास परवानगी दिली नसल्याचे रात्री उशिरा स्पष्ट केले. त्यामुळे रस्ता सुरु राहणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत पुणे वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, ' या रस्त्याच्या संदर्भात महामेट्रोने आम्हाला पत्र दिले होते. मात्र त्यावर आमच्याकडून अजून विचार सुरु आहे. हा रस्ता बंद ठेवायचा असल्यास सर्व बाबींचा आम्हाला विचार करावा लागेल. भविष्यात पूर्ण जनजागृती करून हा रस्ता बंद करण्यात येईल. मात्र आजपासून कुठल्याही परिस्थितीत रस्ता बंद नसेल याची नोंद नागरिकांनी घ्यावी'.