पुणे : जोपर्यंत नदीच्या पाण्याचा दर्जा (वॉटर क्वॉलिटी) सुधारत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. २०१९ च्या निकषानुसार हा दर्जा सुधारणे आवश्यक असून सुधारणा करताना जैवविविधतेचाही गांभीर्याने विचार केला जाण्याची आवश्यकता सजग पुणेकरांनी व्यक्त केली.
नदीमधील मासे, पक्षी, झाडे आणि एकूणच जैवविविधतेचे जतन करण्याकरिता प्लान असावा असे मत व्यक्त करण्यात आले. यासोबतच भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे का? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. नदीपात्रात शहरातील गटारांमधून येणारे मैलापाणी थांबविणे आवश्यक आहे. जायका प्रकल्प पूर्ण क्षमतेने जर पूर्ण झाला नाही किंवा शहरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया झाली नाही तर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर होणारा खर्च वाया जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.
नदीपात्रातील अडथळे दूर करण्यासोबतच, अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नदीच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विचार करूनच सुधारणा केली जाणार आहे. प्रकल्पासाठी राज्य, केंद्र व पालिकेच्या माध्यमातून निधी उभारला जाणार असल्याचे यावेळी दिघे यांनी सांगितले.