पुणे : ‘भजन, गझल, चित्रपटसंगीत अशा सर्वच संगीताच्या मुळाशी शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीताला दाद देणारे रसिक आपल्यातील गायक जिवंत ठेवतात. रसिकांना उत्तम शास्त्रीय संगीत अनुभवता यावे, यासाठी आपण नियमित रियाज, कठोर मेहनत घेतली पाहिजे,’ असा सल्ला शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.संगीतभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आदिनाथ मंगेशकर, डॉ. आर. एम. चिटणीस, मझहर शेख, मिताली मांढरे, योगिनी पोकळे, कल्याणी बेलसरे, प्रा. अंजली साने, प्रा. भिसे आदी उपस्थित होते. राज्यभरातील एकूण २७ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. शास्त्रीय गटात स्वामिनी कुलकर्णी प्रथम, मीता दांडेकर द्वितीय आणि सौरभ पांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उपशास्त्रीय गटात सौरभ पांडे याने प्रथम, मंगेश आबनावे याने द्वितीय तर शीतल गद्रे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ललित आफळे यांनी हार्मोनियम, तर वाङ्मय गोडबोले यांनी तबल्यावर साथ दिली.अंकलीकर-टिकेकर म्हणाल्या, ‘शालेय-महाविद्यालयीनस्तरावर होणाऱ्या स्पर्धांमधून आपल्यातील कलाकार बहरत जातो. श्रीनिवास खळे, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनी आम्हाला प्रोत्साहित केले. वडिलांनी माझ्याकडून सराव करून घेतला. विद्यार्थ्यांनीही रियाजाला जास्तीत जास्त वेळ देऊन आणि क्षमता ओळखून मेहनत केल्यास उत्तम शास्त्रीय संगीत सादर करू शकाल.’आदिनाथ मंगेशकर म्हणाले, ‘शास्त्रीय संगीतातील विविध राग, रागिणी आणि घराणी यामुळे भारतीय संगीत अधिक समृद्ध झाले आहे. कोणत्याही प्रकारचे संगीत शिकण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असणे महत्त्वाचे असून, त्यासाठी आपण ते आत्मसात केले पाहिजे.’ मझहर शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. शुभम मंत्री आणि प्रतीक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कल्याणी बेलसरे यांनी आभार मानले.
रियाज, कठोर मेहनत आवश्यकच : आरती अंकलीकर; गायन स्पर्धेचे पुण्यात पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:32 PM
रसिकांना उत्तम शास्त्रीय संगीत अनुभवता यावे, यासाठी आपण नियमित रियाज, कठोर मेहनत घेतली पाहिजे,’ असा सल्ला शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ठळक मुद्देराज्यभरातील एकूण २७ स्पर्धकांनी घेतला सहभाग संगीत शिकण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असणे महत्त्वाचे : आदिनाथ मंगेशकर