पुणे - राज कपूर यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या चित्रपटांनी चित्रसृष्टीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. याच चित्रपटाचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात दाखल होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ११ जानेवारी रोजी रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते आरके प्रॉडक्शनच्या २३ चित्रपटांच्या मूळ निगेटिव्ह एनएफएआयकडे सुपूर्त केल्या जातील. यामध्ये बॉलीवूड, हॉलीवूड, रशिया, चीन येथील चित्रपटांचाही समावेश आहे. आवारा, श्री ४२०, आग, बरसात, मेरा नाम जोकर, संगम, धरम-करम, राम तेरी गंगा मैली, बॉबी आदी चित्रपटांच्या निगेटिव्ह एनएफआयच्या वॉल्टरमध्ये विराजमान होणार आहेत.जब्बार पटेल यांच्या पुढाकाराने संग्रहालयाच्या खजिन्यात ही मोलाची भर पडत असल्याचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. रणधीर कपूर यांनी २-३ महिन्यांपूर्वी एनएफएआयला भेट दिली होती. यावेळी त्यांनी दस्तावेज, संग्रहालयाची स्थिती, साठवण क्षमता, वॉलचा दर्जा, तापमान संतुलन आदींची पाहणी केली. त्यानंतर मूळ निगेटिव्हचा ठेवा संग्रहालयाकडे सुपूर्त करण्याचे आश्वासन दिले.यापूर्वी संग्रहालयाकडे राज कपूर यांच्या १५-१६ चित्रपट जतन करण्यात आले आहेत. राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये एनएफएआयतर्फे ‘बॉबी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. यावेळी अभिनेते ॠषी कपूर उपस्थित राहणार आहेत. पिफमध्ये आरके चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शन हे चित्रपटप्रेमींसाठी खास आकर्षण ठरणार आहे.मूळ निगेटिव्ह हा संग्रहालयासाठी अत्यंत मोलाचा ठेवा आहे. पुढील पिढ्यांसाठी हा खजिना जतन करुन ठेवणे, अत्यंत गरजेचे आहे. मूळ निगेटिव्ह योग्य तापमानात जतन केल्यास १५० वर्षांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. या निगेटिव्हची स्थिती तपासून त्यांचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन, असेसमेंट याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.- प्रकाश मगदूम
एनएफआयच्या खजिन्यात ‘आरके’ चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:32 AM