सुषमा नेहरकर-शिंदे,
पुणे : मुंबईतील प्रसिद्ध ‘वांद्रे-वरळी सी लिंक’सारखा प्रकल्प आता पुण्यात देखील होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रिंग रोडचा भाग म्हणून खडकवासला धरणावर मालखेड ते वडदरे दरम्यान सुमारे एक किलोमीटरचा सी-लिंक सारखा पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे पुण्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
वांद्रे-वरळी सागरी मार्ग हा मुंबईतला महत्त्वाचा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केला आहे. यासाठी तब्बल सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. याच धर्तीवर पुण्यात देखील खडकवासला धरणावर सी-लिंक सारखा मार्ग प्रस्तावित आहे. या रिंगरोडसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून तब्बल सत्तर टक्के गावांतील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच जमिनीचा मोबदला निश्चित होऊन, प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल. येत्या ऑक्टोबरनंतर रिंगरोडच्या कामाला सुरूवात करण्याचा प्रयत्न आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी रिंगरोड महत्त्वाचा आहे. या रिंगरोडचा एक भाग म्हणून खडकवासला धरणावर मालखेड गाव ते वडदरे गाव दरम्यान सुमारे आठशे मीटरचा हा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. रिंगरोडवर एकूण चार मोठे उड्डाणपूल बांधण्यात येणार असून यात या ‘सी लिंक’ सारख्या प्रकल्पाचा समावेश आहे.
चौकट
साडेसतरा हजार कोटींचा रिंगरोड
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या भोवती पूर्व आणि पश्चिम भागात रिंगरोड होणार आहे. पूर्व भागात १०३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड असून, तो ४६ गावांमधून जातो. पश्चिम भागाचा ६८.३ किलोमीटर लांबीचा रिंग रोड असून, तो ३७ गावांमधून जातो. एकूण १७२ किलोमीटर लांबीचा रिंगरोड मावळ, मुळशी, हवेली, भोर, पुरंदर या पाच तालुक्यांमधील ८१ गावांमधून जातो. या रिंगरोडसाठी १५८५.४७ हेक्टर जमीन संपादित करायची असून, त्यासाठी ४९६३.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण बांधकामासाठी १७७२३.६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
---------