वाघापूर : ‘आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विमानतळ नकोच आहे. आमचा विकासच करायचा असेल तर पाणी, कारखाने, उद्योगधंदे का देत नाही?’ असा संतप्त सवाल करीत ‘आता आमची दखल शासनाने गांभीर्याने घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जातील. त्याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवारी (दि. ६) पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व रस्ते ब्लॉक करण्यात येणार आहेत, असा इशारा विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.खानवडी (ता. पुरंदर) येथे जिल्हा परिषद सदस्य आणि विमानतळविरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रय झुरंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी आता या परिसरातील शेतकरी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत, तर अधिक आक्रमकपणे आंदोलने केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या गावांतील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असून त्या-त्या भागातील सर्व रस्ते बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वच घटकांतील नागरिक आपली गुरेढोरे घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत, सासवड-वाघापूर रस्ता, सासवड-पारगाव रस्ता, झेंडेवाडी-कुंभारवळण रस्ता, पारगाव चौफुला, खानवडी येथील महात्मा फुले स्मारक या प्रमुख रस्त्यांसह इतर रस्तेही बंद करण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता हे आंदोलन सुरू होणार असून बेमुदत केले जाईल. दरम्यान, यानंतरही शासनाने आमची दखल घेतली नाही तर बेमुदत उपोषण, जेलभरो आंदोलने केली जाणार आहेत, असा इशारा देण्यात आला.या वेळी वनपुरी गावाचे सरपंच नामदेव कुंभारकर, माजी सरपंच रामदास कुंभारकर, उदाचीवाडी गावाचे सरपंच संतोष कुंभारकर, पारगावचे सरपंच बापू मेमाणे, अभिमन्यू कुंभारकर, लक्ष्मण बोरावके, संतोष हगवणे, विकास कुंभारकर आदी उपस्थित होते.
रस्ते सोमवारी अडविणार; संघर्ष समितीचा खानवडी येथील बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 6:39 AM