पुणे : पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे हाेत अाहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पुणे देशात दुसरे अाले हाेते. त्यानंतर अनेक विकासकामांना देखील सुरुवात झाली. महापालिकेकडूनही शहराला स्मार्ट करण्यासाठी विविध विकासकामे करण्यात अाली. त्यातच पुण्यातील महत्वाचा असलेल्या जे.एम. रस्त्याचा पदपथ अाकर्षक पद्धतीने सुशाेभित करण्यात अाला. त्यानंतर हा रस्ता शहराची अाेळख म्हणून समाेर येऊ लागला अाहे. अशाच प्रकारचे इतर रस्तेही सुशाेभित करण्यात येत अाहेत. परंतु अाता या रस्त्यावरील पदपथांवर वाहनचालकांकडून अापली वाहने लावली जात असल्याने नागरिकांना चालण्यास अडचणी निर्माण हाेत अाहेत. त्यामुळे शहरातील रस्ते जरी स्मार्ट हाेत असले तरी नागरिक कधी स्मार्ट हाेणार असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
सध्या शहरातील विविध रस्ते अनाेख्या पद्धतीने सुशाेभित करण्यात येत अाहेत. पुण्यातील जे.एम. रस्ताची नव्या पद्धतीने अाखणी करुन ताे सुशाेभित करण्यात अाला. यात पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता यावे यासाठी माेठे पदपथ तयार करण्यात अाले. त्याचबराेबर या ठिकाणी झाडेही लावण्यात अाली. लहान मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना काही काळ बसण्यासाठी व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात अाली अाहे. वाहनांच्या पार्किंगसाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात अाली. जेणेकरुन रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना पार्क केलेल्या वाहनांची अडचण हाेणार नाही. हा रस्ता तयार झाल्यानंतर ताे नागरिकांच्या पसंतीस पडू लागल्याचे चित्र अाहे. नागरिक मनसाेक्तपणे या रस्त्यावरुन फिरताना दिसत अाहेत. परंतु काही वाहनचालकांकडून त्यांची वाहने या पदपथांवर लावण्यात येत असल्याने पायी चालणाऱ्यांना त्याचा अडथळा निर्माण हाेत अाहे. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरुनच चालावे लागत अाहे. त्यामुळे पुन्हा पहिल्या सारखीच परिस्थीती निर्माण हाेत अाहे.