रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील राज्य महामार्गावरील राज्य महामार्ग ११८ साळुबाईचामळा ते (नागरगाव, ता. शिरूर) ते कामठेवाडी या अडीच किलोमीटर अंतर असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याचे काम दोनच महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. त्यानंतर त्याला खड्डे पडायला सुरवात झाली आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, प्रशासनाने या कामाची त्वरित चौकशी करावी व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी उपसरपंच सचिन शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्याचे काम दर्जेदार झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल निघाले आहे, ठेकेदाराने रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कामठेवाडी-साळूबाईचा मळा हा रस्ता ५० वर्षांपासून रखडलेला होता. या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात चिखल तुडवत मुख्य रस्त्याला यावे लागत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून सातत्याने डांबरीकरणाची मागणी जोर धरत होती.
या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर काम सुरु झाले, परंतु हे काम संबंधित ठेकेदाराने दर्जेदार केले नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमार्फत झाले असून या कामासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. चकी रस्त्यावर कारपेट टाकलेले नाही. त्यामुळे डांबराचा प्राथमिक स्तर उखडण्याच्या मार्गावर आहे. पुरेशा प्रमाणात खडीचा व डांबराचा वापर केलेला नाही. इतर ठिकाणी अस्तरीकरणाच्या रोलिंगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याचबरोबर या रस्त्यासाठी ठिकठिकाणी साईडपट्ट्या नसून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याचे मजबुतीकरण, कार्पेट, सिलकोट कसा होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
--
कोट -
या रस्त्याच्या कामाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून उद्या रस्त्याची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल. दर्जा खराब झाला पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- सचिन तापकीर,
अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना