पुणे : कोथरुड येथील कचरा डेपोसमोरील रस्त्यावर विशेषतः डेपो ते वनाज कंपनीच्या दिशेने जाताना सांडलेल्या कचऱ्यातील तेल व द्रव्य यामुळे येथील रस्ता निसरडा बनला आहे. यामुळे या भागात वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत.
याबाबत आम आदमी पक्षाने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम व कोथरूड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जे. डी. पायगुडे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पक्षाने कचरा उचलताना व वाहतूक करताना योग्य त्या खबरदारीचे पालन करावे, सदर कचरा डेपो समोरील रस्त्यावर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या उभ्या विनाकारण उभ्या करू नयेत, रस्त्यावरच छोट्या गाड्यांतून मोठ्या गाड्यांमध्ये कचरा भरला जाऊ नये. तसेच या गाड्यांमधील बारीक कचरा, कचऱ्यातील द्रव्य व तेल या रस्त्यावर सांडल्यास तो लागलीच स्वच्छ करावा, अशी मागणी केली आहे. तसेच कचऱ्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर अपघातात कोणा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन आम आदमी पक्ष सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, असा इशाराही दिला आहे.
सहायक आयुक्त कदम यांनी यापुढे सर्व खबरदारी घेण्याबाबत आपच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. या शिष्टमंडळात आप वाहतूक विंगचे राज्य संयोजक श्रीकांत आचार्य, आप कोथरूड विधानसभा संयोजक डॉ. अभिजित मोरे, अभिजित परदेशी, सादिक सय्यद, अमोल बगाडे उपस्थित होते.