लोकमत न्यूज नेटवर्कओझर : ओझर व लेण्याद्री यांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. राज्य-परराज्यांतून लाखो भाविक अष्टविनायक गणपती दर्शनासाठी येतात. जुन्नर तालुक्यात विघ्नहर गणपती, ओझर व गिरिजात्मज, लेण्याद्री ही दोन तीर्थक्षेत्रे आहेत. या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा ओझर, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत मार्गे लेण्याद्री असा एकमेव मार्ग आहे.या रस्त्याचे गेली अनेक वर्षे काम झालेले नाही. रस्त्याच्या साइडपट्ट्या काटेरी झुडपांनी वेढल्या आहेत. काही ठिकाणी साईडपट्ट्या १ फुटाने खचल्या आहेत. या रस्त्यावर जागोजागी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे छोटेमोठे अपघात झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटक नेहमीच सार्वजनिक बांधकाम विभागाला शिव्यांची लाखोली वाहतात. तीर्थक्षेत्र विकसांतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी लाखो रुपयांची घोषणा होते; परंतु रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था आहे. हा निधी नक्की कोठे खर्च होतो, हा गहन प्रश्न भाविकांना पडतो.
तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता मृत्यूचा सापळा
By admin | Published: May 25, 2017 3:01 AM