पानशेत ते टेकपोळे याही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पानशेत धरणाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची खडी उखडली आहे. खाचखळग्यांतून, खड्ड्यांतून आपटत प्रवास करावा लागत आहे. रस्ता पूर्णतः उखडून दगडगोटे वर आले आहेत. मातीचे थर जमा झाले आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोठेही गटारे दिसत नाहीत.
दर वर्षी पावसाळ्यात डोंगरावरून माती वाहून रस्त्यांवर येत असते. ही माती अशीच पडून राहिल्यामुळे उन्हाळ्यात धूळ नाका-तोंडात व डोळ्यांत मोठ्या प्रमाणावर जात असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहे. दगडधोंड्यातून गाडी चालवताना अपघात होत आहेत. खड्ड्यांवर मातीचे थर साचले असल्यामुळे खड्डे दिसत नाही. त्यावरून वाहने गेली की वाहनचालकाचा अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याची भीती नाकारता येत नाही.
"पानशेत धरण परिसरातील पानशेत ते घोल व पानशेत ते टेकपोळे येथील रस्ते पूर्णतः उखडलेले आहेत. अनेक वेळा संघटनांनी व माध्यमांनी मागणी करूनसुद्धा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कोणताही विचार केला जात नाही. येथील समस्याचे घोंगडे जाणूनबुजून भिजत ठेवले जात आहे आणि नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे." - शंकर ढेबे, अध्यक्ष, यशवंत सेना वेल्हे