कल्याण - नगर रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले होते. या रस्त्यावरील खुबी ते माळशेज घाट या चार कि. मी. लांबीत मोठे-मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रुप ग्रामपंचायत खुबी आणि मनसेचे मकरंद पाटे यांनी नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण आणि सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची सूचना करून पत्रव्यवहारही केला होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभाग यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या सूचनेची तातडीने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे . खा . डॉ. कोल्हे यांच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
२२नारायणगाव
खुबी ते माळशेज घाट दरम्यानच्या ४ कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.