पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणीच्या मांडीला स्पर्श करून तिची छेडछाड करणाऱ्या व बसमधून उतरल्यानंतरही तिचा पाठलाग करणाऱ्या रोडरोमियाला पोलिसांनी अटक केली. प्रभातकुमार तिवारी (वय २६, रा. कुरळी फाटा, चाकण) असे या अटक केलेल्या रोडरोमियोचे नाव आहे. याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार भोसरी ते पुणे स्टेशन असा प्रवास करत असताना तसेच पुणे स्टेशन येथे सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही मैत्रिणीबरोबर भोसरी ते पुणे स्टेशन असा बसने प्रवास करीत होती. आरोपी प्रभातकुमार हा फिर्यादी यांच्या मागे उभा राहून जाणून बुजून त्यांच्या मांडीला स्पर्श करत होता. बसमध्ये धक्का बसल्याचे दर्शवून त्यांना मागून धक्का देत असे. फिर्यादी या पुणे स्टेशन येथे बसमधून उतरल्यानंतर त्यांच्या पाठीमागे तो पाठलाग करत येत होता. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.