पुणे : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे या पिकाचा झालेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने स्वामिनाथ आयोगाने सुचविलेल्या तुरतुदीप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित टोमॅटोला किमान ५० टक्के हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे, माजी अध्यक्ष संजय साष्टे, फलटण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी जितेंद्र जाधव, जयराम थोरात उपस्थित होते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २३) रोजी मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांसह हमाल, मापाडी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.डॉ. आढाव म्हणाले, शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे. टोमॅटो, कोथिंबिर आणि कांद्याच्या बाबतीत ही परिस्थिती नेहमी उद्भवते . किमान या तीन शेतीमालांना हमीभाव देणे अपेक्षित आहे. सुरूवात टोमॅटो पासून करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठविण्यात आले आहे. या शेतमालाच्या हमीभावासाठी राज्यातील ३०० हून अधिक बाजार समित्यांनी हमीफंड उभारावा. यास राज्य सरकारने मदत करावी. जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल़. टोमॅटोपासून सॉस बनविला जातो. सॉसची किमान १०० रुपये किलो भावाने विक्री होते. हा बनविण्यासाठी फक्त २० रुपये खर्च येतो. हा बनविणाऱ्यांना इतका नफा मिळतो. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. यात हस्तक्षेप करून सरकारने टोमॅटोल त्वरित हमीभाव द्यावा असे नागरे यांनी सांगितले. तर शेतकरी जयराम थोरात यांनी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी हमीभाव देण्याची मागणी यावेळी केली.
टोमॅटोच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार : बाबा आढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 7:36 PM
शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देबाजार समिती कार्यालयासमोर २३ एप्रिल रोजी निदर्शनेटोमॅटोला किमान ५० टक्के हमीभाव द्यावा अशी मागणी