डावा कालव्यावर कृषी महाविद्यालय ते शिवणे येथील शिंदेपूल हा रस्ता सध्या महापालिकेच्या जुन्या हद्दीपर्यंतच आहे.
पाटबंधारे विभागाला पालिका त्याचे भाडेही देते. गेल्या काही वर्षांत कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर या भागात प्रचंड लोकवस्ती वाढली असून पुढे बहुलीपर्यंत सध्या असलेल्या एकमेव रस्त्यावर या सर्व गावांचा ताण येतो. अगदी सांगरूण ते निळकंठेश्वर पर्यंतच्या सर्व गावांसाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होते. विशेषतः कोंढवा गेट ते वारजेपर्यंत वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे कोंडी होऊन कित्येकदा वाहतूक ठप्प होते.
यावर मार्ग काढण्यासाठी डावा कालव्यवरील पर्यायी रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा, तसेच तो शिंदे पुलापासून कोंढवा गेटपर्यंत पुढे वाढवण्यास परवानगी मिळावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती.
हा रस्ता वाढविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी सुळे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तीन कोटी इतक्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.