प्रसाद कानडे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) रविवारी पुण्यात दाखल होत आहेत. मोदी ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावर सध्या युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. चार ठिकाणी एका रात्रीत डांबरीकरण झाले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदींचा कॅनव्हा काही मिनिटांतच पोहचेल. मात्र, रोज याच रस्त्यावरून जाताना सामान्य पुणेकरांना ट्रॅफिक, रस्त्यावरील कोंडी याचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना रोज ३० मिनिटे रस्ते वाहतुकीत खर्च करावा लागत आहेत. मोदी मात्र फुर्रकन निघून जाणार आहेत.
पुणे विमानतळांवर मोदी यांचे विमान उतरविल्यानंतर ते विमानतळावरून हेलिकॉप्टरने शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पोहोचतील. तिथून मोटारीने महापालिकेत पोहोचतील. यासाठी पुणेकरांना दुचाकीने किमान ९ मिनिटे लागतात. महापालिका येथून ते गरवारे मेट्रो स्टेशन येथे जातील. पुणे महापालिका ते गरवारे अंतर कापण्यासाठी ८ मिनिटे लागतात. मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन झाल्यावर ते गरवारे - आनंद नगर स्टेशन हा प्रवास मेट्रोने करतील. यासाठी त्यांना ८ मिनिटे लागतील. रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने हाच प्रवास सर्वात जास्त वेळखाऊ आहे. गरवारे ते आनंदनगरसाठी रस्त्यावरून जाताना किमान १० मिनिटे लागतात व आनंद नगर स्टेशन ते एमआयटी महाविद्यालय येथे जाण्यासाठी तीन ते साडेतीन मिनिटे पुणेकरांना लागतात. या सर्वांचा विचार केला पुणेकरांना रोज ३० ते ३५ मिनिटे लागतात. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विशेष व्यवस्था असल्याने ते हा प्रवास अवघ्या ८ ते १० मिनिटात पूर्ण करतील.
मार्गांवर एका रात्रीत डांबरीकरण :
पंतप्रधान मोदी ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावर चार ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनजवळच्या भागापासून ते जंगली महाराज रस्त्याच्या सुरुवातीचे सिग्नलपर्यंत डांबरीकरण केले. गरवारे ते अभिनव चौक या रस्त्यावरदेखील डांबरीकरण केले आहे. तसेच रामबाग कॉलनी रिक्षा थांबा ते एमआयटीला जाणारा रस्तादेखील डांबरीकरण झालेला आहे.
रस्त्यांवर फ्लेक्सबाजी :
मोदींचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार आहे, त्या सर्व रस्त्यांवर स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूला फ्लेक्स लावले गेले. फ्लेक्सची संख्यादेखील जास्त आहे.