पुणे : शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा पालिकेचा निर्णय योग्य असून या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळेल. यासोबतच जुने वडे, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. हा निर्णय शहराच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याचे क्रेडाई पुणेचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितले. शहराच्या अनेक भागात जुन्या इमारती आहेत. याभागात अरुंद रस्ते आहेत. याठिकाणी अग्निशामक दलाची वाहनेही जाऊ शकत नाहीत. त्यातच ड्रेनेज, जलवाहिन्या आणि अन्य सुविधांची अवस्था बिकट आहे. सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरता येत नसल्याने विकास रखडला आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास विकासाला चालना मिळेल. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा जुन्या इमारतींना होणार आहे. या इमारतींचे पुनर्निर्माण झाल्यास लिफ्टपासून सर्व आधुनिक सोई मिळू शकणार आहेत. पार्किंगला जागा उपलब्ध होऊन रस्ते मोठे होतील. रस्त्यांचे रुंदीकरण करीत असतानाच इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणेही आवश्यक आहे. ड्रेनेज, जलवाहिन्या, भूमिगत केबल्स आदी पायाभूत सुविधाही आधीच उपलब्ध करून द्यायला हव्यात. बांधकाम व्यावसायिक पालिकेच्या या निर्णयामुळे आनंदी आहेत. या निर्णयामुळे टीडीआर वापरला जाऊ शकेल. पालिकेलाही बांधकाम शुल्कामधून उत्पन्नात वाढ मिळेल. राज्य शासनाने सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरास परवानगी दिल्यास आणि फ्रंट मार्जिनमध्ये दीड मीटरची सवलत दिल्यास त्याचाही बांधकाम व्यवसायाला फायदा मिळू शकेल. बांधकाम व्यवसायाला उभारी देण्याकरिता अशा निर्णयांची आवश्यकता असून त्यामुळे शहराच्या विकासलाही हातभार लागेल असे मर्चंट म्हणाले.
रस्ता रुंदीकरणामधून बांधकाम व्यवसायाला मिळेल उभारी : सुहास मर्चंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:11 PM
जुने वाडे, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग होईल मोकळा
ठळक मुद्देनिर्णय शहराच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्त्यांचे रुंदीकरण करीत असतानाच इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणेही आवश्यक