भोर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कर्नावड ते कुडपणेवाडी रस्त्याचे काम सुरू आहे. दोन वर्षे उलटले तरी हे काम अपूर्ण अवस्थेत असून कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. या कामाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी कुडपणेवाडी येथील ग्रामस्थांनी केेली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंर्तगत आंबवडे खोऱ्यातील कर्नावड ते कुडपणेवाडी हे सव्वा किलोमीटरचे काम असून यासाठी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये डांबरीकरण, कारपेट, मोऱ्या आणि शेवटच्या टप्यात काँक्रीट रस्ता असे काम आहे. २०१८ साली कामाला मंजुरी मिळाली आहे. मागील दोन वर्षे काम झालेच नव्हते. मागील महिन्यात मोऱ्यांची व डांबरीकरण कारपेटचे काम झाले आहे. मात्र, ते निकृष्ट झाले आहे. तर शेवटच्या टप्प्यात गावातून जाणारा रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी दोन महिने उखडून ठेवला आहे. हे काम करत असताना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन उखडल्याने ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सदरचे काँक्रीटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
दोन वर्षांनंतर या ररस्त्याचे काम सुरू झाले तेही निकृष्ट करण्यात आले. माेरीचे सिमेंट हाताने निघन असून कारपेटही निघू लागले आहे. यासंदर्भात स्थानिकांनी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या उपअभियंता यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, या कामाबाबत सदर विभागाच्या अधिकाऱ्यांना संर्पक करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल उचलला जात नाही
निकृष्ट कामाला जबाबदार काेण
भोर तालुक्यात अनेक गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे मंजूर आहे मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता अनेकदा कामावर नसतात त्यामुळे कामांचा दर्जा खराब होत आहे. अनेक कामे दोन-तीन वर्षांपासून रखडलेली आहेत. अनेक कामे निकृष्ट आहेत याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
२४ भोर रस्ता
कर्नावड कुडपणेवाडी रस्त्याचे रखडलेले काम.