सध्या जनता वसाहतपर्यंतच्या ७. ५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम पथ विभागाकडून सुरु झाले असून, रोहन कृतिका सोसायटी मागील रस्त्यावरील पाणीपुरवठ्याच्या बंद पाईपलाईन वरून जाणाऱ्या पुलाचे काम हाती घेतले आहे. यासाठी गेल्या वर्षी अडीच कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील काम बंद होते. सध्या या रस्त्यावरील पुलाचे काम सुरु केले असून, हा पूल पूर्ण झाल्यानंतर वडगाव पुलापासून जनता वसाहतपर्यंत दुचाकी वाहनांसाठी प्रवास शक्य होणार आहे.
सिंहगड परिसरात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी वडगाव पुलापासून ते जनता वसाहतपर्यंतच्या पर्यायी रस्ता विकसित करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यातील वडगाव पुलापासून ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
------------------
पर्यायी रस्त्याचा या भागातील नागरिकांना होणार उपयोग
सिंहगड रस्त्यावरील खडकवासला,किरकटवाडी, नांदेड सिटी, वडगांव, नऱ्हे, धायरी आदी भागांसाठी सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. वाहनांची संख्या वाढल्याने सातत्याने या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत असून परिणामी सतत वाहतूककोंडी बघायला मिळते. वडगाव पूल टी जनता वसाहतपर्यंतच्या पर्यायी मार्गामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
------------------------------
जनता वसाहतपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर बंद पाईपलाईन असून यावर पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दुचाकी वाहतूक शक्य आहे, त्यामुळे वडगाव पूल ते जनता वसाहतपर्यंत प्रवास सुरु होईल.
- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, महापालिका
------------------------