लोणावळा : लोणावळा शहरातील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक सकाळी सात ते रात्री नऊ या काळात बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक वलवण ते खंडाळा या बायपास वजा द्रुतगती मार्गावर वळविण्यात येणार आहे. लोणावळा शहरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या हलगर्जीपणामुळे अपघात वाढले आहेत, असा आरोप करीत नागरिकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते राकेश सोनवणे यांनी शहरातील जागरूक नागरिक व सर्व पक्षीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
लोणावळा शहरात मनशक्ती केंद्र ते खंडाळा दरम्यान रस्ता दुभाजक तीन आठवड्यांत पूर्ण करणे, अपघात प्रवण क्षेत्रात स्पीड ब्रेकर बसविणे आदी मागण्यांबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, पथदिवे बसविण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला ना हरकत मिळविण्याबाबत माॅर्थ विभागाकडे पाठपुरावा करणे, मनशक्ती केंद्र ते दुसरा पेट्रोलपंप दरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम लवकर सुरू करणे, नाझर काॅर्नर येथील एस टर्न काढण्याचे तांत्रिक सर्वेक्षण करून आयआरबीमार्फत काम करण्याचे आश्वासन आयआरबीचे जयवंत डांगरे यांनी दिले आहे. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात येईल, तसेच आवश्यकता असल्यास खासगी जागामालकांचे संमतीपत्र घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले आहे.