कुरुळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील विविध गावच्या रस्त्यांची वळवाच्या पावसाने चाळण झाली आहे. हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील लोक प्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी केली आहे.
खेड तालुक्यातील दक्षिण भागातील कुरुळी, निघोजे, मोई, चिंबळी, केळगाव आदी गावे येतात. या भागातील रस्ते जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, पूर्वी केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य रस्त्यासाठी वापरण्यात आल्यामुळे या भागातील सर्व रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व समस्यांचा विचार करून कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव या गावांच्या हद्दीतील नादुरुस्त रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सरपंच चंद्रकांत बधाले, अरुण फलके, रमेश गायकवाड, उपसरपंच आशिष येळवंडे यांनी केली आहे.जीव मुठीत घेऊन प्रवासगेल्या दोन दिवसांपासून वळवाच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे संपूर्ण रस्तेच खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांमधून वाट काढणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार, कष्टकरी मजूर, दूध व्यावसायिक, शेतकरी बांधव यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांची, वाहनचालकांची तर तारांबळ उडत असून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.